Search This Blog

Thursday 19 April 2018

जाता जाता काही क्षण

जाता-जाता.... काही क्षण....

            कृषी महाविद्यालय कोल्हापूरला बी.एस्सी. ॲग्रीला असतानाची गोष्ट आहे.  पावसाळ्याचे दिवस होते. नेहमीप्रमाणे मी संध्याकाळी मैदानावर आलेलो होतो. अंधार पडला होता. पाऊस पडून गेल्यामुळे धावपट्टीवर कुठेकुठे चिखलही झाला होता. अंधारामुळे पायाखालचे व्यवस्थित दिसत नसल्यामुळे धावपट्टीवरून धावणं तसं थोडं धोक्याचंच होतं. वाॅर्मअप झाला आणि धावण्यासाठी मी सुरुवात केली. लक्ष धावपट्टी कडेच होतं. वेगही  मंदच होता आणि दबकत दबकतच  धावणे सुरू होतं. पहिली फेरी अर्धी होत आली. मागून प्रकाशाचा झोत धावपट्टीवर पडला. खाली-वर वर-खाली होत राहिला. माझी पहिली फेरी पूर्ण झाली. दुसरीही, तिसरीही आणि शेवटी पाचवी ही. कोणीतरी माझ्या मागून चालत येणारे बॅटरीचा झोत पुढे मारत होतं. त्यामुळे मला धावपट्टी दिसत होती आणि मी बिनधास्तपणे एकेक करत पाच फेऱ्या पूर्ण केल्या. मनापासून मी त्या व्यक्तीला खूप धन्यवाद दिले. माणूस स्वतः तर चालत होताच पण त्याबरोबर मलाही धावण्यासाठी प्रकाश मदत करत होता. मला खूप छान वाटल.
             अंगातून स्रवणाऱ्या घामाच्या धारा शांत समाधानी मन एक वेगळीच अनुभुती व शिकवण देऊन गेल्या.  धावून  झाल्यावर मी चालत चालत फेरी सुरू केली. जी व्यक्ती मला प्रकाश दाखवत होती ती व्यक्ती मला ओलांडून पुढे गेली. माझ्या लक्षात एक गोष्ट आली. ती मुद्दाम पुढे उजेड दाखवत नव्हती. त्या व्यक्तीच्या हातात बॅटरी होती व चालताना हात वर-खाली होत होता. आणि त्यामुळे उजेड समोर दूरपर्यंत पडत होता. त्या व्यक्तीला याची कल्पनाही नसेल कदाचित. ती व्यक्ती स्वतःसाठीच जरी चालत असली तरी स्वतःच्या चालण्यासाठी तिने घेतलेल्या उजेडामुळे इतरांचेही चालणे सुसह्य व सहजशक्य झाले होते. मनाला खूप भारी वाटल. प्रत्येक माणूस असच आयुष्य जगला तर...... आपली वाट प्रकाशमय करत असताना इतरही काही जनांची वाट प्रकाशमय झाली तर..... किती छान ना! आणि तीही आपल्याला यत्किंचितही नुकसान न पोहोचवता. ज्यांच्या आयुष्यात आपण प्रकाश पसरवतो त्यांना किती आनंद वाटत असेल ना...! मग कधी कधी हे करत असताना आपल्या थोडे कष्ट सोसावे लागले तर काय फरक पडतो? जर त्याने एखाद्याच्या अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश डोकावणार असेल आणि त्या  एखाद्याचं आयुष्य सुखमय करणार असेल तर.... मग ते कायमचे असो वा काही कालावधीसाठी.... नक्कीच काही फरक पडत नाही. आदर पडला तरी तो फारसा नाही... आणि एखाद्याला होणाऱ्या  फायद्या पुढे तर नक्कीच काही नाही.
               बी. एस्सी. शेवटच्या वर्षी आमच्या कृषी अभियांत्रिकी विभागाची सहल रत्नागिरी महाबळेश्वरला गेली होती. बरेच चढ-उताराचे, वळणावळणाचे, सोपे-कठीण सौंदर्याने नटलेले, रस्ते होते. एखाद्या वळणावर अचानक समोरूनही एखादी गाडी यायची. अगदी अचानक वळण असल्यामुळे  समोर येणारे वाहन दिसायचं नाही आणि मग एखादा जबरदस्त कट बसायचा. एकदम वेगात.... बसमधील झोपलेल्या मेंबर्सना काही प्रॉब्लेम नसायचा,  पण जागे असलेल्या मेंबर्स पैकी बऱ्याच जणांची झोप उडायची.
               12- 1 ची वेळ होती. गाडी वळणावळणाच्या रस्त्यावरून डोंगर उतरून खाली येत होती. काही-काही ठिकाणी एकदम तीव्र वळणं होती. चालकाचा त्याठिकाणी कस लागायचा. आमच्या गाडीचे चालक मात्र  एकदम भारी होते. कसाही रस्ता असो गाडी एकदम टकाटक व भरधाव न्यायचे. एक वळण पार करत असताना आमच्या ड्रायव्हर मामांनी गाडी थांबवली. आमच्या पुढे एक पांढऱ्या रंगाची मोठी बस थांबली होती. वळण व्यवस्थित घेता न आल्यामुळे गाडी कठडा ओलांडून थोडी पुढे गेली होती. आणखी थोडी पुढे गेली असतील तर काय झाल असत काय माहित? गाडीचे आणि गाडीतल्या मंडळींचे... कोणत्यातरी मुंबईकडील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ती सहल होती. मुलं-मुली, शिक्षक-शिक्षिका सर्वजन बस भोवती गोळा झाले होते. सर्वजण एकदम चिंताग्रस्त वाटत होते. बिचारा ड्रायव्हरची तर अवस्था फारच बिकट होती. झाल्या प्रकाराने तो खूपच धास्तावला होता. त्याने एकट्याने बस परत घेऊन वर काढण्याचा प्रयत्न केलेला पण  बस अधिक खाली जात होती. मुलांना धक्का  द्यायला सांगूनही त्याला बस वरती घ्यायला जमले नव्हते. आम्ही खाली उतरलो. ड्रायव्हर मामा पुढे त्यांच्या मागे आम्ही. आमच्या मागे आमच्या विभागाच्या कृषी-मैत्रिणी. आम्ही जवळ जाऊन विचारपूस केली.  त्यांचे शिक्षक-शिक्षिका, सर्व विद्यार्थी झालेल्या प्रकाराबद्दल सांगू लागले.
              आम्ही उतरल्यावर बरे झाले कोणीतरी मदतीला आलं, हा भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. आमच्या बसचे ड्रायव्हर मामा त्या बसमध्ये चढले व बस सुरू केली. बस थोडी-थोडी खाली सरकत होती. रिवर्स गिअर असूनही मग मामांनी सर्व मुलांना पुढून मागे ढकलायला सांगितले. आमच्या आधी ही त्या मुलांनी तसा प्रयत्न केला होता पण ते यशस्वी झाले नव्हते. त्यामुळे आमच्या प्रयत्नाबद्दल त्यांचे बरेच शिक्षक संशयित नजरेने पाहत होते. आम्ही बस ढकलायला सुरुवात केली होती. आमच्या ड्रायव्हर मामांच्या प्रयत्नामुळे व आम्हा मुलांच्या धक्क्यामुळे अर्ध्याच्या वर बस वर आली. ते बघून उरलेली अभियांत्रिकी महाविद्यालयाची मूलही धक्का द्यायला आली आणि बघता-बघता बस रस्त्यावर आली.
            सर्वांनी टाळ्या वाजवल्या. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकांनी आणि मुलांनीही... आणि आमच्या विभागाच्या कृषी मैत्रिणींनीही... एक प्रकारचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सार्यांनी आम्हाला धन्यवाद दिले आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. जर आम्ही त्यांना मदत नसती केली तर.... त्यांना क्रेन आणावी लागली असती. ती लांबून याला किती वेळ लागला असता? तोपर्यंत किती वेळ गेला असता? आमचा थोडा वेळ गेला पण त्यांच्या या वेळा पुढे काहीच नव्हता आणि बस रस्त्यावर आल्यावर वाजवलेल्या टाळयांमुळे  झालेल्या त्या आनंदापुढे ही काहीच नव्हता.  आमच्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींनी आमच्या विभागाच्या मुलींसमोर इतक्या आनंदाने टाळ्या वाजवाव्यात हीही एक मोठी आनंद देणारी गोष्ट होती. आमच्यातील काही जणांसाठी....
            आयुष्याच्या प्रवासात सहज जाता-जाता केलेली थोडीशी मदतही एखाद्याला खूप उपयोगी पडून जाते. एखाद्याचा मोठा त्रास, कष्ट  वाचवून जाते. आणि अशी मदत करण्याची संधी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी  येतेच. आपण ती संधी ओळखून नक्की जाता-जाता एखाद्याला थोडीशी तरी मदत करावी, तसा प्रयत्न तरी करावा.
              अशा छोट्याशा मदतीमुळे एखाद्याच्या आयुष्यात आपण थोडा जरी आनंद देऊ शकलो, थोडा जरी कष्ट, दुःख कमी अथवा नाहीसे करू शकलो तर या सारखी मोठी समाधानाची गोष्ट आपल्या आयुष्यात दुसरी कोणती असेल असं मला वाटत नाही आणि एकमेकांच्या  एकमेकाला केलेल्या सहकार्यामुळे एकमेकांच आयुष्य नक्कीच सुखमय होईल. मग आपलेही अन इतरांचेही.... जय हो.... मंगल हो...

पद्मकुमार आण्णासाहेब पाटील
Reg.No.K-10-123
Mob.No.-9028590717
Email- padmajay0123@gmail.com

No comments:

Post a Comment

रावेतील आठवण

दमी rawe साठी म्हौप्रे तालूका कऱ्हाड जिल्हा सातारा येथे होतो येथील खूप काही अविस्मरणीय आठवणी आहेत त्यातील एक एके दिवशी मी आणि माझा मित्र हेम...