Search This Blog

Thursday 19 April 2018

श्रीगोंदा - कोल्हापूर व्हाया... पुणे.


[09/04 2:06 am]  +91 86930 31333 :

 श्रीगोंदा - कोल्हापूर व्हाया... पुणे.
                       ....हरिष खेडकर
                          ( K- 86083 )
                       पोलीस निरीक्षक
          महादजी शिंदे हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज मधुन 12 वी परीक्षा जुन 1986 मध्ये  72% ने पास होवुन कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे प्रवेश मिळाला होता. कधीही दौंड, नगर यापेक्षा दुरवर प्रवास  केलेला नव्हता.       आयुष्यात प्रथमच कोल्हापूर ला जायचे होते. सोबतचे रंगनाथ उंडे, अनिल ओगले, श्रीकांत देशमाने असे आम्ही सर्वजणांनी प्रथम  श्रीगोंदा-पुणे व नंतर पुणे- कोल्हापूर  असे कोल्हापूर ला येवुन कृषि महाविद्यालयात प्रवेश तर घेतला. एवढे मार्क असुनही होस्टेल मिळाले नाही. कोल्हापुरातील काही माहिती नाही. बाहेर भाड्याने खोली कोठे घ्यावी, कोणाचे ओळखीने घ्यावी, काहीही समजत नव्हते.  आम्ही चौघेही महालक्ष्मी भक्त निवास मध्ये राहात होतो, पण तिथे तरी किती दिवस राहणार? पाच सहा दिवसानंतर नव्यानेच ओळख झालेल्या एका व्यक्तीने साठमारी गल्लीत गिता बिल्डींग मध्ये एक खोली भाड्याने घेवुन दिली.
त्या ठिकाणावरून कृषि महाविद्यालय ईतके दुर होते की, सकाळी 0800 चे लेक्चर ला आम्ही 0600 वाजता निघत असु.
खोलीपासुन बाईचा पुतळा ( राजारामपुरी) एका बसने व तेथुन शिवाजी विद्यापीठा दुसरी बस आणि पुढे विद्यापीठ काॅर्नर ते काॅलेज पायी पायी.
अशी ही रोजची फरफट, मग सर्वांनी ठरविले की, काॅमन ऑफ ला गेले की सायकल घेऊन यायचे. पण आमचे घरी तर सायकल सुध्दा नव्हती. काय करावे काहीच समजत नव्हते.
काॅमन  ऑफ ला घरी आलो, वडिलांना सर्व काही खरे खरे सांगुन टाकले. वडिलांना माझी नक्कीच दया आली असावी, वडिलांनी एक जुनी सायकल 90 रुपयात विकत घेवुन दिली. आता कोल्हापूरला सायकल घेवुन जायचे तर श्रीगोंदा कोल्हापूर डायरेक्ट एस टी पण नाही.
मग मी श्रीगोंदा मुंबई बस ने सकाळी 0700 वाजता निघुन पुण्याला जावुन तेथुन कोल्हापूरला जायचे ठरविले.
सायकल  व सफारी सुटकेस, तीही सामानाने भरल्याने जड झालेली कशीतरी हॅडलला अडकवुन स्टॅंडवर आलो. एस टी चे टपावर सायकल पक्की बांधुन  बरोबर सात वाजता एस टी श्रीगोंदा येथुन सुटली.मी कंडक्टर कडुन पुण्याचे तिकीट घेतले. 
अकरा वाजणेचे  सुमारास गाडी पुण्यात आली,  पुण्यात यापुर्वी एकदाच आलेलो होतो. कोल्हापूर ला प्रवेश घेण्यासाठी जाते वेळी. पण त्यावेळी एस टी दौंड पाटस मार्गे स्वारगेटला आलेली, मुंबई गाडी शिरुर शिक्रापुर मार्गे आलेली, पुण्यातले काहीही समजत नव्हते. मला वाटत होते की ही बस स्वारगेटला नाही गेली तरी शिवाजी नगरला नक्कीच जाईल, म्हणून मी कंडक्टरला काहीही न विचारता शिवाजीनगर एस टी स्टॅंड येण्याची वाट पहात सिटवर बसून राहिलो. खिडकीतून बाहेरचे दुकानाचे बोर्ड वाचत होतो. खडकी, निगडी, चिंचवड अशी नावे बोर्डावर वाचुन मनात शंकेची पाल चुकचुकली.  आपण पुण्याचे  फार पुढे आलो आहोत याची जाणीव झाल्याने पोटात भितीने गोळा आला होता.
सिटवरुन उठुन मोठ्याने कंडक्टरला आवाज दिला, "ओ, कंडक्टर साहेब, शिवाजीनगर कधी येणार?".
माझ्या या प्रश्नांने कंडक्टर सहित सर्व प्रवाशी  माझ्याकडे असे पाहत होते की, हे बावळट कुठुन  आलं आहे?.
कंडक्टर तर इतका रागावला की, बस! माझेवर मोठ्याने खेकसुन  म्हणाला, " मी किती वेळ झालाय मोजतोय  एक प्रवासी जास्त कोण आहे?, पुण्यात गाडी उभी केली होती त्यावेळी का उतरला नाहीस?"
मी आपले घाबरत घाबरत म्हटले , मला वाटले गाडी  शिवाजीनगरला जाईल". कंडक्टरने माझे काहीही  न ऐकता, सिंगल बेल मारुन गाडी रस्त्याच्या बाजूला घेवून मला खाली उतरुन दिले व दरवाजा बंद करु लागला, तेवढ्यात मी ओरडलो," ओ साहेब, माझी सायकल वर आहे ना !"
आता मात्र कंडक्टर पुरता चिडला होता, पण काहीच करु शकत नव्हता. तो खाली उतरला मला टपावर जायला सांगितले व मी बांधलेली सायकल सोडून त्यांचे हातात दिल्यावर  त्यांनी उतरुन खाली घेतली व माझ्याकडे एखाद्या गुन्हेगारांसारखे पाहुन एस टी मध्ये बसुन पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाला.
       आता ईथुन पुढे माझी खरी परीक्षा सुरु झाली, आपण कोठे उतरलो आहोत, हा कोणता एरिया आहे, याची काहीही माहिती नाही.  कोणाला तरी विचारुन शिवाजी नगर कसे जायचे ते जाणुन घेतले. सुटकेस हॅडलला अडकवुन सायकल प्रवास सुरू केला, जड सुटकेस मुळे हॅडल एका बाजुला ओढत होते, भर दुपारची वेळ, अंगातुन घामाच्या धारा निथळत होत्या. पोटात कावळे ओरडायला लागले होते. तरीही तसेच विचारीत विचारीत  शिवाजी नगर ला पोहोचलो. कोल्हापूर ला जाणारे गाडीची चौकशी केली. चौकशी बुथ मधून बोलणाराचे शब्द म्हणजे डोक्यात घणाचा एक एक घाव घातले सारखेच वाटले. " कोल्हापूरला गाडी  ईथुन सुटत नाही, स्वारगेट वरुन सुटते ".
मी मटकन बाकड्यावर  बसलो.आता येथुन स्वारगेटला कसे जायचे? पहिले आईने बांधून दिलेली भाजी भाकरी बाकड्यावर बसुन खाल्ली , नळावर जावुन हाथ धुवून यथेच्छ पाणी पिवुन घेतले. लोकांकडून स्वारगेटला जाणारा रस्ता विचारला पण पुण्यात पहिल्यांदाच आलेल्या माणसाला कितीही सांगितलं तरी काय समजणार?
शेवटी बस स्टॅंडचे बाहेर आलो, पाहतो तर शिवाजी नगर- स्वारगेट अशी पाटी असलेली सिटीबस दिसली. मनाने निश्चय केला या बस पाठोपाठ सायकल चालवत जायचे.
निघालो बस चे माघे माघे, बस चे स्पिडने सायकल चालविणे शक्य  होत नव्हते, त्यातच हॅडल ची सुटकेस त्रास देत होती. पण बस सिग्नल ला थांबली की अंतर कव्हर करित होतो. अशा प्रकारे घामाघुम होवुन जवळ जवळ एक तासात स्वारगेटला पोहोचलो. कोल्हापूर जाणारी एस टी आले नंतर सायकल टपावर टाकुन पक्की बांधून घेतली.
आणि एकदाचा कोल्हापूर प्रवास सुरू झाला. बसमधेच आईने दिलेली व दुपारी शिल्लक राहिलेली भाजी भाकरी खाल्ली, कराड स्टॅंड वर खाली जावुन नळाला तोंड लावुन पाणी पिवुन आलो.  रात्री नऊ चे सुमारास कोल्हापूर स्टॅंड वर उतरलो व परत सायकल चे पैडल मारीत मारीत खोलीवर पोहोचलो.
मित्रांना झाले प्रवासाचे वर्णन करता करता झोप केव्हा लागली ते ही समजले नाही.
    असा हा "श्रीगोंदा ते कोल्हापूर व्हाया पुणे " प्रवास  आजही जशाचा तसा डोळ्यासमोर उभा राहतो.
[09/04 2:06 am]  +91 86930 31333 : सुचनेनुसार लेख पाठविला आहे.... आवडला.. योग्य वाटला तर सामाविष्ठ करा...
हरिष खेडकर...K 86083

No comments:

Post a Comment

रावेतील आठवण

दमी rawe साठी म्हौप्रे तालूका कऱ्हाड जिल्हा सातारा येथे होतो येथील खूप काही अविस्मरणीय आठवणी आहेत त्यातील एक एके दिवशी मी आणि माझा मित्र हेम...