Search This Blog

Thursday 19 April 2018

फुलपंखी दिवस

फुलपंखी दिवस

लेखक : रेणुकादास कुलकर्णी (K-80)

     
      तेव्हा खरंच आपण सर्वार्थाने "धम्माल"आयुष्य जगलोय. आपल्या बॅचने जो सुवर्णकाळ अनुभवला, जी धम्माल केली, जी मैत्री जपली,टिकवली त्याची सर कशालाच नाही. त्याच "संजीवनीने" आजही मनाने आपण काॅलेजकुमारच आहोत आणि घट्ट मित्रही आहोत.

 कोल्हापूरने मलाही घडवले. माझ्याकडे तर आठवणींचे भांडारच आहे. अगदी पांडुच्या कँटिनच्या खमंग पदार्थांपासून पासून (आणि त्याच्या मामाच्या अर्ध्या खाकीचड्डीच्या खिश्यांपासून—सायकल आणि जाडजूड मिशांपर्यंत )लक्ष्मणच्या बनियनने न झाकल्या जाणार्‍या ढेरीपासून ते केरबाच्या प्रत्येक टेबलापर्यंतच्या फेरीपर्यंत (उचगांव) आणि बिडवेंच्या (राजारामपुरी) हाॅटेलपासून (ए वन हाॅटेल?) डोंबारवाड्यातील खमंग किस्से, इकाॅनामिक्सच्या साळवे सरांच्या "घड्याळ लपवून आणण्याच्या" ज्योक्सपासून "लिवाच्चं,वाचाच्चं,बोलाच्चं, त्येला एक्स्टेंशन म्हणाच्चं" असं सांगणार्‍या कांबळे (देशमुख) सरांबद्दल, "सखूची मारली, ठकूची मारली" असे "बुद्धिमान"ज्योक्स सांगून आणि "बुद्धिबळ" ही शिकवणारे, वातावरण "फ्रेंडली" करणारे सर्वार्थाने आदरणीय मराठेसर यांनी आपल्या कृषि महाविद्यालयातील सगळ्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या सगळ्या प्रांतांत आणि येणार्‍या आव्हानांत बुद्धि स्थिर ठेवून हिंमतीने, ज्ञानाने, समर्पणाने, एकजूटीने,हसतमुखाने आणि वेळ पडल्यास एकट्यानेही लढण्याची ताकद,धैर्य, खेळकरपणा, मिश्किलपणा आणि सुसंस्कृतपणाचाही धडा देणार्‍या आदरणीय गुरुवर्यांपर्यंत सगळ्यांच्या आठवणी काळजाच्या कुपीत सुरक्षित जपल्या आहेत. असे जवळपास सगळचे गुरुजन मला नेहमीच आठवतात. त्यांची निष्ठा, विद्यार्थ्यांबद्दलची आपुलकी, काळजी, अभिमान आणि कौतुक , आशीर्वाद यांच्या बळावरच आज आपण सर्वजण उभे आहोत.

 आदरणीय रा.भा. जाधवसर, पी.टी.पाटीलसर, एस.एस. पाटीलसर, देशपांडेसर, कौलगुडसर, यादवसर (बोचॅनिकल नेम फेम),पॅथाॅलाजीचे रुईकरसर,पाटीलसर, , जयसिंगराव पवारसर, खांबे सर,इंगळेसर, कर्णिक सर,  महांबरीसर, दोन्ही कुलकर्णी सर, महाले सर, घोळवेसर, जतकर सर (Vetarinary स्पेलिंग मध्ये "आय" घालण्याचा किस्सा), नायडूसर,भगतसर, नाटकातील हिरोच्या स्टेजवरील माझ्या एंट्रीआधी स्वत:चा "चष्मा" माझ्या डोळ्यांवर प्रेमाने लावून मला आशीर्वाद देऊन "अभिनयाची नवी दृष्टी" देऊन माझे जीवनच "आनंदाची सृष्टी" करणारे वंदनीय श्री आनंद जाधवसर या सर्व गुरुजनांबद्दल कितीही लिहिले तरीही कमीच आहे. होस्टेलची व्यवस्था पाहणारे श्री गवळीही मला आजही आठवतात. कांही सरांची नांवं राहिली असल्यास मला आठवण करुन द्या कृपया. "चिप्रीकर"सरांचीही "आठवण" आहेच. या सगळ्या गुरुजनांना  मन:पूर्वक वंदन.

पांडुच्या कँटिनला "चंदन" लावण्यापासून  होस्टेलला "पॅरासाईट्सचे" "नंदनवन" करणारे मित्रही तेवढेच प्रिय आहेत. "खोलीत अंधार करुन तोंडात माचिसच्या जळत्या काड्या ठेऊन नाचणारे आणि त्यांना अचानक  अंधारात "भूत" समजून ओरडत पळणारे, प्रसंगी घाबरवून रेक्टरसरांनाही पळवणारे, सरांकडे "काड्या" करणारे, होळी पेटवून "नंगानाच" करणारे, उघड अभ्यास करणारे, गुपचूप अभ्यास करणारे, "सर, प्लीज अर्धा मार्क द्या" म्हणणारे सगळे नमुने पाहिले आपल्या बॅचने. माझ्या तर बर्‍याच जणांचे रोल नंबर्स/गांवही लक्षात आहेत. अभंग k80001 अभंग , अरणीकर2, साहेबराव ,आगाव, आठरे5, 6 नंबर सुधीर, 10 नंबर टेन सर म्हणणारा मित्र बेग, 66 नंबर पहिलवान संभाजी बयाजी कदम नरखेड, संपत शिदू करांडे,शाळगांव, करचे, विनोदवीर मोहन कदम , कांचन,कानडे,कडस्कर, 78विलास, 81 मन्या,82नंदू,83प्रदीप,84 हलकट शिरोमणी रेणुकादास, 85 गरीब शांत अशोक कुपाडे, तिकुटे,लोणकर कलढोणे, अशी सगळी मित्रमंडळी आजही आठवतात. किरण आर्वे,सुधाकर,सतीश, सुपेकर. आपल्या मित्रांच्याही "टोळ्या" असायच्या. "इंगळे, होलमुखे, जाधव, अनील लांडगे (87?), बारागजे, जयवंत, संतोष, , सुधीर—श्रीकांत (एसट्या), अशी उदाहरणं. 

मित्रांमध्येही "गुरु"मंडळी होती. तन्मयतेनं शिकवणारे माझे मित्र व्यायामात आणि अभ्यासावरही "लांडग्याप्रमाणे" तुटून पडायचे. मला त्याचा नेहमीच अभिमान वाटायचा. केशव मलगुंडे, नालबंद, माया वाघमोडे, भगवान देशपांडे, सुश्रूत, समीर पटेल, ढोले, पिंपळे,गायकवाड,काळे,भुजबळ, नाना, गारुळे या मित्रांनीही माझं जीवन समृद्ध केलं. किरण आर्वे हा देखील मस्त मित्र. वेंकट मला बुद्धिबळात भारी पडायचा. ज्युनियर रोकडे पण खूप छान बुद्धिबळ खेळायचा. अभ्यास, नाटक,क्रिकेट,सिनेमा, व्यायाम,गप्पा,यामध्ये मी सगळ्यांमध्ये असल्यामुळे तसेच पहिले वर्ष राजारामपुरीत आणि दोन वर्षं होस्टेलला असल्यामुळे माझी 180 पैकी बहुतेक सगळ्यांशीच गट्टी होती. अरविंद,संजय पवार (काळ्या), शितोळे, तुषार,प्रमोद, पिंट्या, नृसिंह, भिंगार्डे,खाडे,बाळासाहेब, गावडे, मधु, गोलांदे (काका पुतणे), हे सगळे सगळे आठवतात. त्यांना माझी आठवण आहे की नाही माहित नाही. ही सुरुवात आहे आठवणींची पोतडी उघडायची. बाय द वे, काॅलेजला माझ्या वडिलांची आणि जीजीच्या वडिलांची पहिली भेट झाली. त्यावेळी मी बारावीनंतर फाॅर्म भरुन आजोळी गेलो होतो. तिथं एका मुलीच्या आकर्षणात (प्रेमात नाही) पडलो होतो. प्रकरण बाॅलिंग पर्यंतच होतं. पण मी फाॅर्मात आणि धुंदीत—तारेत होतो. माझा वेटिंगला 153 वा नंबर असल्याची तार मिळताच तातडीने पळत आलो. त्याआधी वडील कोल्हापूरला दोनदा येऊन काॅलेजमध्ये येऊन मुदत मागून गेले होते. माझ्या "गांंडमस्तीत" अॅडमीशन हुकले असते, पण वडीलांची धडपड आणि काॅलेजची "कृपा" म्हणून मी शिकू शकलो. त्यावेळी जीजी मामनची पहिली भेट झाली. त्याला हिंदी मराठी येत नव्हतं आणि माझं इंग्लिश मलाच कळत नव्हतं. पण, पोरीच्या सुवर्णमृगरुपी आकर्षक जाळ्यातून सुटून विद्यापीठाच्या भावी "सुवर्णपदक"विजेत्या जीजी मामनच्या सोबतीने काॅलेजात प्रवेश घेतला, हा माझ्या जीवनातला खरा सुवर्णक्षण. मनमोकळे लिहिले आहे. तेव्हाचे माझे कांही मित्र आता सभ्यतेचा मुखवटा लावून फिरत असतील तर त्यांनी हा लेख वाचून दुखवटा पाळायला हरकत नाही.

लेखक : रेणुकादास कुलकर्णी (K-80)

No comments:

Post a Comment

रावेतील आठवण

दमी rawe साठी म्हौप्रे तालूका कऱ्हाड जिल्हा सातारा येथे होतो येथील खूप काही अविस्मरणीय आठवणी आहेत त्यातील एक एके दिवशी मी आणि माझा मित्र हेम...