Search This Blog

Thursday, 19 April 2018

चोरीचा मामला

Tukaram B.Patil (TB) - K 85136:
😋🤔 चोरीचा मामला..😋🤭
             बँच...१९८५...

वर्ष दुसरे...१९८६-८७.खोली नं.२१८ मजला ३ रा.
मी(तुका),राज्या कांबळे अन् सुधीर शिंदे... तिघं रूम पार्टनर...
आमच्या पैकी सुधीर सुशिक्षित घरचा अन् नाशिक शहरवासी रहिवाशी असलेला व मी आणि राज्या खेडवळ पार्श्वभूमीचे,साधेसुधे पण अट्टल हुषार...
आमचा सुधीर नाशिकला घरी जाऊन आल्यावर चांगलंचुंगलं खायाला उदा.लाडू,भाजके शेंगदाणे वगैरे...😋 पिशवीतून घेऊन येत असे व ते त्याच्या कुलूपबंद कपाटात ठेवीत असे.पण ते त्याच्या भुकेनुसार व गरजेनुसार थोडंथोडं एकटाच खात असे.😔
पण...आम्ही तिघेही वेगवेगळ्या बँचला हुतो अन् याच संधीचा फायदा घेऊन आम्ही दोघांनी एकदाचं ठरवून टाकलं की...
सुधीरच्या खाऊवर सिस्टीमँटीकपणे डल्ला मारायचाच...😅
पण सुधीरला त्याची जरासुद्धा कुणकुण लागू द्यायची नाही याचीही आम्ही दोघंही काळजी घेत असे.त्यासाठी सुधीर खाऊ कसा खातो व ठेवून देतो याचे निरीक्षण करून घेतले.
मग आमचं अभियान सुरू...😂
सुधीर एकदाचा काँलेजला गेला रे गेला अन् त्याची खात्री खिडकीतून एकदाची झाली की...
मग एकानं खिळ्यानं हळूच खटक्याचं छोटंसं ते कुलूप काढायचं आणि सुधीर जेवढा खाऊ खायचा नेमक्या तेवढ्याच खाऊवर आम्ही दोघं (यथेच्छ...🤔) डल्ला मारयचो अन् उर्वरित परिस्थिती जैसे थे करून ठेवायचो....
आणि दोघंही खदखदून आनंदाने हसायचो..😂😂
पण...
आम्ही खाऊचोरीची पध्दत योग्यरित्या वापरलेने आमची चोरी शेवटपर्यंत मुळ मालकाला कळली नाही...
त्यामुळे खाऊचा स्टाँक शिल्लक असेपर्यंत...
मालकही खुश...😂
अन्...
डल्लेबहाद्दर ही खुश...😂😂
आजरोजी या त्रिकुटापैकी...
सुधीर मलेशियात...
तुका...कृषी अधिकारी...
तर...
राजाभाऊ..तालुका कृषी अधिकारी...
म्हणून कार्यरत...👍👍
लेखक...
तुकाराम पाटील(टी.बी.)
के-८५
🙏🏻😂😋🤔🤭😂🙏🏻

Dinkarao Patil ,k66, [13.04.18 08:14]


Dinkarao Patil ,k66, [13.04.18 08:14]
मागील आठवणींचा संदर्भ देत आज परत दुसऱ्या आठवणी लिहीत आहे.पहिल्या वर्षी आम्ही बावड्यात होस्टेल वर राहत होतो, ग्रामीण भागातील विद्यार्थी बावडा मध्ये व चांगली आर्थिक परिस्थिती असणारे व शहरी मुले सिटीत रहात होती.कॉलेज निवडणूक व gathering मध्ये दोन तट होते.पण ग्रामीण मुले सरस होती त्यांना परिस्थिती ची जाणीव होती.आमचे ncc चे बूट आमच्या वजनापेक्षा भले मोठे होते,बस मधून आम्ही ncc ला जात असू,काहीवेळा सकाळी प्रॅक्टिकल साठी आम्ही बसने फार्म site uchgaon ला जात असे.त्या काळी आमच्या कॉलेजमध्ये मुली न्हवत्या. काही वात्रट मुले बसमधून सिटी परिसरातील रस्त्यावर कागदी बाण सोडून आनंद लुटत असे.,बावड्यात चव्हाण यांचे हॉटेल होते तेथे आम्ही सर्वजण चहा व नाश्त्यासाठी जात असू,खिश्यात दिडकी नसायची परंतु ते आम्हाला उधार ठेवत असे ,आम्ही पण गावाकडून पैसे आले की देत असू,चव्हाण हॉटेल मालक फार माणुसकीचा असणारा माणूस होता,ते आज हयात नाहीत , आता बावड्यातुन जाताना त्यांची आठवण येते. प्रत्येकवेळी आई मला लाडू देत होती  मी ते ट्रंक मध्ये ठेवी पण आमचे रूम पार्टनर माझ्या परस्पर  त्याचा फडशा पाडत होत,त्याला माझा स्वभाव कारणीभूत होता हे मान्य करावे लागेल.होस्टेल मेस आम्ही विद्यार्थी चालवत असू, काहीजण त्यात काळा बाजार करत असे व चहापाण्याचे व नाष्टा पैसे बाहेर काढत,ते आम्हाला आवडत नसे,असो आज इथेच थांबतो परत भेटूया, नमस्कार, धन्यवाद.. .

श्रीगोंदा - कोल्हापूर व्हाया... पुणे.


[09/04 2:06 am]  +91 86930 31333 :

 श्रीगोंदा - कोल्हापूर व्हाया... पुणे.
                       ....हरिष खेडकर
                          ( K- 86083 )
                       पोलीस निरीक्षक
          महादजी शिंदे हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज मधुन 12 वी परीक्षा जुन 1986 मध्ये  72% ने पास होवुन कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे प्रवेश मिळाला होता. कधीही दौंड, नगर यापेक्षा दुरवर प्रवास  केलेला नव्हता.       आयुष्यात प्रथमच कोल्हापूर ला जायचे होते. सोबतचे रंगनाथ उंडे, अनिल ओगले, श्रीकांत देशमाने असे आम्ही सर्वजणांनी प्रथम  श्रीगोंदा-पुणे व नंतर पुणे- कोल्हापूर  असे कोल्हापूर ला येवुन कृषि महाविद्यालयात प्रवेश तर घेतला. एवढे मार्क असुनही होस्टेल मिळाले नाही. कोल्हापुरातील काही माहिती नाही. बाहेर भाड्याने खोली कोठे घ्यावी, कोणाचे ओळखीने घ्यावी, काहीही समजत नव्हते.  आम्ही चौघेही महालक्ष्मी भक्त निवास मध्ये राहात होतो, पण तिथे तरी किती दिवस राहणार? पाच सहा दिवसानंतर नव्यानेच ओळख झालेल्या एका व्यक्तीने साठमारी गल्लीत गिता बिल्डींग मध्ये एक खोली भाड्याने घेवुन दिली.
त्या ठिकाणावरून कृषि महाविद्यालय ईतके दुर होते की, सकाळी 0800 चे लेक्चर ला आम्ही 0600 वाजता निघत असु.
खोलीपासुन बाईचा पुतळा ( राजारामपुरी) एका बसने व तेथुन शिवाजी विद्यापीठा दुसरी बस आणि पुढे विद्यापीठ काॅर्नर ते काॅलेज पायी पायी.
अशी ही रोजची फरफट, मग सर्वांनी ठरविले की, काॅमन ऑफ ला गेले की सायकल घेऊन यायचे. पण आमचे घरी तर सायकल सुध्दा नव्हती. काय करावे काहीच समजत नव्हते.
काॅमन  ऑफ ला घरी आलो, वडिलांना सर्व काही खरे खरे सांगुन टाकले. वडिलांना माझी नक्कीच दया आली असावी, वडिलांनी एक जुनी सायकल 90 रुपयात विकत घेवुन दिली. आता कोल्हापूरला सायकल घेवुन जायचे तर श्रीगोंदा कोल्हापूर डायरेक्ट एस टी पण नाही.
मग मी श्रीगोंदा मुंबई बस ने सकाळी 0700 वाजता निघुन पुण्याला जावुन तेथुन कोल्हापूरला जायचे ठरविले.
सायकल  व सफारी सुटकेस, तीही सामानाने भरल्याने जड झालेली कशीतरी हॅडलला अडकवुन स्टॅंडवर आलो. एस टी चे टपावर सायकल पक्की बांधुन  बरोबर सात वाजता एस टी श्रीगोंदा येथुन सुटली.मी कंडक्टर कडुन पुण्याचे तिकीट घेतले. 
अकरा वाजणेचे  सुमारास गाडी पुण्यात आली,  पुण्यात यापुर्वी एकदाच आलेलो होतो. कोल्हापूर ला प्रवेश घेण्यासाठी जाते वेळी. पण त्यावेळी एस टी दौंड पाटस मार्गे स्वारगेटला आलेली, मुंबई गाडी शिरुर शिक्रापुर मार्गे आलेली, पुण्यातले काहीही समजत नव्हते. मला वाटत होते की ही बस स्वारगेटला नाही गेली तरी शिवाजी नगरला नक्कीच जाईल, म्हणून मी कंडक्टरला काहीही न विचारता शिवाजीनगर एस टी स्टॅंड येण्याची वाट पहात सिटवर बसून राहिलो. खिडकीतून बाहेरचे दुकानाचे बोर्ड वाचत होतो. खडकी, निगडी, चिंचवड अशी नावे बोर्डावर वाचुन मनात शंकेची पाल चुकचुकली.  आपण पुण्याचे  फार पुढे आलो आहोत याची जाणीव झाल्याने पोटात भितीने गोळा आला होता.
सिटवरुन उठुन मोठ्याने कंडक्टरला आवाज दिला, "ओ, कंडक्टर साहेब, शिवाजीनगर कधी येणार?".
माझ्या या प्रश्नांने कंडक्टर सहित सर्व प्रवाशी  माझ्याकडे असे पाहत होते की, हे बावळट कुठुन  आलं आहे?.
कंडक्टर तर इतका रागावला की, बस! माझेवर मोठ्याने खेकसुन  म्हणाला, " मी किती वेळ झालाय मोजतोय  एक प्रवासी जास्त कोण आहे?, पुण्यात गाडी उभी केली होती त्यावेळी का उतरला नाहीस?"
मी आपले घाबरत घाबरत म्हटले , मला वाटले गाडी  शिवाजीनगरला जाईल". कंडक्टरने माझे काहीही  न ऐकता, सिंगल बेल मारुन गाडी रस्त्याच्या बाजूला घेवून मला खाली उतरुन दिले व दरवाजा बंद करु लागला, तेवढ्यात मी ओरडलो," ओ साहेब, माझी सायकल वर आहे ना !"
आता मात्र कंडक्टर पुरता चिडला होता, पण काहीच करु शकत नव्हता. तो खाली उतरला मला टपावर जायला सांगितले व मी बांधलेली सायकल सोडून त्यांचे हातात दिल्यावर  त्यांनी उतरुन खाली घेतली व माझ्याकडे एखाद्या गुन्हेगारांसारखे पाहुन एस टी मध्ये बसुन पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाला.
       आता ईथुन पुढे माझी खरी परीक्षा सुरु झाली, आपण कोठे उतरलो आहोत, हा कोणता एरिया आहे, याची काहीही माहिती नाही.  कोणाला तरी विचारुन शिवाजी नगर कसे जायचे ते जाणुन घेतले. सुटकेस हॅडलला अडकवुन सायकल प्रवास सुरू केला, जड सुटकेस मुळे हॅडल एका बाजुला ओढत होते, भर दुपारची वेळ, अंगातुन घामाच्या धारा निथळत होत्या. पोटात कावळे ओरडायला लागले होते. तरीही तसेच विचारीत विचारीत  शिवाजी नगर ला पोहोचलो. कोल्हापूर ला जाणारे गाडीची चौकशी केली. चौकशी बुथ मधून बोलणाराचे शब्द म्हणजे डोक्यात घणाचा एक एक घाव घातले सारखेच वाटले. " कोल्हापूरला गाडी  ईथुन सुटत नाही, स्वारगेट वरुन सुटते ".
मी मटकन बाकड्यावर  बसलो.आता येथुन स्वारगेटला कसे जायचे? पहिले आईने बांधून दिलेली भाजी भाकरी बाकड्यावर बसुन खाल्ली , नळावर जावुन हाथ धुवून यथेच्छ पाणी पिवुन घेतले. लोकांकडून स्वारगेटला जाणारा रस्ता विचारला पण पुण्यात पहिल्यांदाच आलेल्या माणसाला कितीही सांगितलं तरी काय समजणार?
शेवटी बस स्टॅंडचे बाहेर आलो, पाहतो तर शिवाजी नगर- स्वारगेट अशी पाटी असलेली सिटीबस दिसली. मनाने निश्चय केला या बस पाठोपाठ सायकल चालवत जायचे.
निघालो बस चे माघे माघे, बस चे स्पिडने सायकल चालविणे शक्य  होत नव्हते, त्यातच हॅडल ची सुटकेस त्रास देत होती. पण बस सिग्नल ला थांबली की अंतर कव्हर करित होतो. अशा प्रकारे घामाघुम होवुन जवळ जवळ एक तासात स्वारगेटला पोहोचलो. कोल्हापूर जाणारी एस टी आले नंतर सायकल टपावर टाकुन पक्की बांधून घेतली.
आणि एकदाचा कोल्हापूर प्रवास सुरू झाला. बसमधेच आईने दिलेली व दुपारी शिल्लक राहिलेली भाजी भाकरी खाल्ली, कराड स्टॅंड वर खाली जावुन नळाला तोंड लावुन पाणी पिवुन आलो.  रात्री नऊ चे सुमारास कोल्हापूर स्टॅंड वर उतरलो व परत सायकल चे पैडल मारीत मारीत खोलीवर पोहोचलो.
मित्रांना झाले प्रवासाचे वर्णन करता करता झोप केव्हा लागली ते ही समजले नाही.
    असा हा "श्रीगोंदा ते कोल्हापूर व्हाया पुणे " प्रवास  आजही जशाचा तसा डोळ्यासमोर उभा राहतो.
[09/04 2:06 am]  +91 86930 31333 : सुचनेनुसार लेख पाठविला आहे.... आवडला.. योग्य वाटला तर सामाविष्ठ करा...
हरिष खेडकर...K 86083

Sunday, 1 April 2018

क्रिकेट मँच

*चित्तथरारक क्रिकेट मँच*

 एक दिवस कृषि महाविद्यालयाच्या आपल्या जिमखान्या समोरील मैदानावर  सिनियर्स विरूध्द ज्युनियर्स क्रिकेट मँचचे आयोजन करण्यात आले होते. सिनियर्सचे कप्तान होते क्रिकेटचे आशिक राजेंद्र कांबळे (सध्या T O Satara)
     ज्युनियर्स टीमचा कप्तान कोण ते आता नक्की आठवत नाही पण या मैचमध्ये thrill आणण्याच्या बाबतीत मनोज बोडकेची आठवण होते. दुर्दैवाने मनोज आज आपल्यात नाही.
   हा सामना चांगलाच अटीतटीचा होणार याचा अंदाज तसा सर्वाना होताच. या सामन्यासाठी पंच कोण नेमायचे हा मोठा प्रश्न होता. कारण
दोन्ही टीम मध्ये  जसे हुशार,  शांत  व समंजस खेळाडू होते तसेच  आगाऊ व 'पट्टीच्या' खेळाडूंचीही काही कमतरता नव्हती.सर्वानुमते मग अप्पासाहेब धुळाज (सध्या अपर जिल्हाधिकारी) यांचेकडे पंच म्हणून जबाबदारी देण्यात आली
  नाणेफेक झाली.  प्रथम ज्युनियर्स ची फलंदाजी   होती .मी स्वयंघोषित  कॉमेंटेटरच्या भूमिकेत.  स्पीकर  नव्हता तरी उत्साह दांडगा होता.
    एखाद्या महत्वाचेया आंतरराष्ट्रीय सामन्यासारखे थ्रिल प्राप्त झालेल्या सामन्यात ज्युनियर्सनी 100 धावा केल्या होत्या अन जिंकायला टार्गेट होते 101.
     सिनियर्सची फलदाजी सुरु झाली.ज्युनियर  टीम मध्ये मनोज जाधव हा (सध्या P I मुंबई) एक अष्टपैलू अस्सल सातारी खेळाडु होता .
तस पाहीलं तर मनोजचा खेळ आणि आमचा जल्लोष व पाठबळ हीच काय ती ज्युनियर्सची  जमेची बाजू व रणनीती .
     शेवटचे षटक होते. सिनियर्सना जिंकण्यास ६ धावाची आवश्यकता होती. सिनियर्स संघाचा कर्णधार राजू कांबळे फलदांज आणि गोलंदाज अर्थात मनोज जाधव.
जणू आंतरराष्ट्रीय सामन्यासारखा चित्तथरारक व आम्हा पाठीराख्या प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारा हा प्रसंग.
   मनोजने पहिला चेंडू टाकला आणि तो निर्धाव पडला. सर्व ज्युनियर्सचे प्लेअर व आम्ही पाठीराखेदेखील मैदानात
सर्वजण मनोजला भेटून प्रोत्साहन देत होते.
कोणी रुमालानी चेडु पुसून देत होता तर कोणी पंचाना सांगत होते निर्णय योग्य द्यायचा.  आम्हाला हार पाहायची सवय नाही
फलंदाजावर दडपण आणि मनोज जाधवने दुसरा  चेंडू  टाकला तोही निर्धाव. सर्वत्र एकच  जल्लोष . राजू जरी कसलेला फलंदाज असला तरी त्याच्यावरील दडपण वाढले आणि मनोज चा तिसरा चेडु देखील निर्धाव पडल्यावर काय विचारूच नका.  काय प्रचंड तणाव,  उत्सुकता शिगेला पोहोचलेली.  आम्ही काही जणनी हात वर करुन मैदानाला एक राऊंड टाकला.
    फलंदाजाच्या तणावात अधिकच भर आणि मनोजचा चौथा चेंडूही जेंव्हा निर्धाव पडला तेंव्हा तर आम्ही सर्वानी सारे मैदान डोक्यावर घेतले.सैरावैरा धावायला लागलो. कोण कोल्हाटी उड्या मारतंय तर कोणी आनंदात मैदानावर गडगडा लोळतंय असा सारा माहौल.
   प्रचंड तणाव,  आनंदमिश्रीत उत्सुकता आणि मनोजने पाचवा चेंडू टाकला . तो देखील जेंव्हा निर्धाव पडला तेंव्हा काय विचारता योय नाही असा
ज्युनियर्सचा  जल्लोष.आता समीकरण होते केवळ १ चेंडु  आणि जिंकायला आवश्यक होत्या ६ धावा.
मग काय मनोजला आणि राजू कांबळेला सुचनांचा नुसता पाऊस
पंचाना काहीचा गराडा.
मला सचिन लोंढे  अभय जाधव(आबड्या) मनोज बोडके आम्हाला मनोज बाबत पक्की खात्री होती मनोज हा अतिषय हुषार शांत व संयमी असा आमचा गुणी खेळाडू होता. सर्वाच्या सूचना देऊन झाल्या. मनोज परत आपल्या बोलिंग मार्कवर.  प्रचंड शांतता आणि खिळलेल्या उत्सुक नजरा.
 मनोजने ६ वा चेंडू टाकला आणि अर्थात तोही निर्धावच. ज्युनियर्सनी हा सामना जिंकला  होता.
आम्ही सर्वानी अगदी मैदान डोक्यावर घेतले होते.
       भारताने वर्ल्ड कप सामना एकदा हारला होता आणि विनोद कांबळी तेथेच बसून रडला होता अगदी तसेच राजू काबळेचे झालेले आणि तो देखील तडक आपल्या खोलीत जाऊन ढसढसा रडला होता.
   मग विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरु झाली आम्ही राजारामपुरीत जाऊन स्टेरीओ साऊंडला  संध्याकाळची ऑर्डर  दिली
  मी , मनोज बोडके आबड्या शहरातुन जरा जरा सोमरस घेऊन आलो
मग काय डान्सला सुरुवात झाली.
तुफान डान्स झाला त्यामध्ये डिस्को भांगडा खेकडा असे अनेक प्रकारचे डान्स झालेआणि मग रात्री १२ ते१ दरम्यान सर्वजण झोपायला रुम मध्ये गेले नेहमीप्रमाणे लोंढे आबड्या मन्या बोडके आणि मी T V  हॉलला झोपायला गेलो. सुमारे तीस वर्षापूर्वीच्या या चित्तथरारक सामन्याची आठवण आजही मनावर  ताजी आहे.

लेखन - आप्पा गौड *के 86 Agricos मित्र* 

रावेतील आठवण

दमी rawe साठी म्हौप्रे तालूका कऱ्हाड जिल्हा सातारा येथे होतो येथील खूप काही अविस्मरणीय आठवणी आहेत त्यातील एक एके दिवशी मी आणि माझा मित्र हेम...